कृषी वार्ता पत्र:- सरफराज दोसानी
माहूर:- माहूर तालुका हा बंजारा प्रवण म्हणून ओळखला जात असून ही जमात पावसाळ्यापूर्वीच धूळ पेरणी करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या वर्षी तूर्तास गुवाहाटी येथे गेलेले शिवसेनेचे बंडखोर कृषी मंत्री दादा भुसे यांनी योग्य पर्जन्यमान शिवाय पेरण्या करू नका अशी वारंवार विनंती करून सुद्धा या परिसरातील बंजारा जमाती बरोबर आदिवासी व इतर अठरापगड जमातींनी त्यांचेच अनुकरण करून एक जून रोजी धूळपेरणी करत आर्थिक दृष्ट्या दुष्काळात तेरावा महिना ला साद दिली आहे. हे प्रकरण थांबले नसुन ७ जूनच्या अल्पशा पावसाने कापूस तूर सोयाबीन मूग उडीद ही पिके अल्प पावसामुळे जमिनीतील उष्णतेचा बळी होऊन फुगली. परिणामी बळीराजाला मृग नक्षत्रातच पहिला झटका बसला आहे . त्यानंतर सुद्धा 15 जूनला झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी कृषी खात्यांचा सल्ला धुडकावत स्वतःच कृषी पंडितांचा आव आणत दुबार पेरणी केली, परंतु पावसाअभावी ती सुद्धा वाया गेल्याने मुंबई दिल्ली सुरत गोहाटीतील पंच तारीका हॉटेलमध्ये मेजवानी वर ताव मारणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ताड्यावर येऊन वैफल्य ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

माहूर या दुर्गम व आदिवासी तालुक्यात सिंचनाची व्यवस्था बोटावर मोजण्या एवढी असून जमिनीचा स्तर तृतीय व चतुर्थ श्रेणी च्या प्रतवारी चा आहे. पूर्वीच्या कालखंडात माहूर ची जंगले राज्यात क्रमांक दोनची मानली जायची, परंतु वन तस्करी मुळे ही जंगले नामशेष होऊन प्रजन्यमान रोडावले आहे.परिणामी पूर्वीच्या कष्टकरी बंजारा शेतकऱ्यांना समृद्ध वनराई तमुळे धूळ पेरणी केली तरी निसर्ग कृपेने भरपूर उत्पन्न यायचे, त्याच सवयीने यावर्षी शेतकर्यांचा दुहेरी घात केला आहे. महागडी बियाणे मशागत पेरणी साठी लागणारा प्रचंड खर्च हा दोन वर्षांचा दुष्काळ पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा असला तरी स्थानिक बँकांनी कर्जपुरवठा बाबतीत काखा वर केल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती माय जेऊ देईना बाप भीक मागू देईना अशी झाली आहे. जगाचा पोशिंदा दरवर्षीप्रमाणे परिस्थितीशी दोन हात करत असला तरी सत्ता स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्ष मुंबईला जाऊन टाळूवरचे लोणी खाण्यात मशगुल आहे, असा आरोप मकापा नेते कोम्रेड शंकर सिडाम यांनी केला आहे.एकंदरीत बळीराजाचे मानसिक खच्चीकरण झाले असून वैफल्य ग्रस्त परिस्थितीत आत्महत्येचे सारखा घातकी निर्णय घेण्यापूर्वी प्रशासन – शासनाने शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे आहे.
