राज्य सरकारमधील अस्थिरतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम!

माहूर:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्राथमिक प्रक्रिया सुरु आहे. यात जि.प.,पं.स.ची वाढीव गट, गण व प्रभागाची रचना जाहीर झाली आहे. त्यानंतर तालुक्यातील जि.प.पं.स.संभाव्य इच्छुकांनी आपआपल्या सर्कल मध्ये संपर्क अभियान सुरु केले होते; मात्र सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे निवडणुका होणार की नाहीत, असा संभ्रम निर्माण झाला असल्याने इच्छुकांनी ‘वेट ॲण्ड वाच’ ची भूमिका घेतली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या दोन वरुन तीन, तर पंचायत समितीची सदस्यसंख्या ४ वरुन ६ करण्यात आली आहे.संभाव्य आरक्षणाचा भूत अनेक मातब्बरांना घरी बसण्याची वेळ आणणारा होता; मात्र वाढलेल्या लखमापूर सर्कल मुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि अनेक इच्छुक उमेदवार सक्रीय झाले आहेत.निवडणुकीच्या अनुषंगाने गट गणाच्या आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यामुळे कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील, अशी अपेक्षा असताना मागील काही दिवसांपासून राज्यात उदभवलेल्या राजकिय अस्थिरतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मुद्दा बाजुला पडला असून, सत्ताधारी आपली सत्ता वाचविण्याच्या प्रक्रियेत गुंतल्यामुळे निवडणूक प्रक्रीया लांबणीवर पडेल की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची धामधुम गत महिन्या पासून सुरु झाली होती. स्थानिक पातळीवरचे नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी एकत्रितपणे मोर्चेबांधणी सुरु केली होती; मात्र सध्याची राजकिय अस्थिरता पाहता तुर्तास निवडणुकीसंदर्भात कुठलाही निर्णय होण्याची शक्यता दिसत नसल्याने खिश्यावर भार पडू नये म्हणून इच्छुकांनी आपल्या मतदार संपर्क अभियानाला ‘ब्रेक’ लावल्याचे दिसत आहे.