सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून श्रीक्षेत्र माहूरगड विकासाला चालना देऊ – पालकमंत्री अशोक चव्हाण

माहूर  :- श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन 2010 मध्ये 79 कोटी रुपयाच्या मूळ आराखड्यास मान्यता दिलेली आहे. यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंर्तभाव केलेला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्यादृष्टिने लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक सर्व संबंधित विभाग प्रमुख व सन्माननीय मंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन याला चालना देऊ, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाशा धोंडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.