बियाण्यांच्या भपकेबाज जाहिरातीने बळीराजा संभ्रमात!

माहूर( सरफराज दोसानी   ):- उन्हाचा पारा उतरला व लग्नसराईची लगभगही संपत आली.आता बळीराजा अंतर्गत मशागत संपवून पेरणीच्या तयारीला लागला आहे.कृषी केंद्र  बियाण्यांसाठी सज्ज झाले असून माहूर शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी आता पासूनच गर्दी केलेली दिसते. मात्र दिशादर्शक बियाण्यांच्या भपकेबाज जाहिरातीने शेतकरी वर्गात वेगवेगळ्य संशयकल्लोळ माजला असून वेगवेगळ्या प्रलोभन व स्क्रीममुळे महागड्या बियाण्यांच्या विश्वासार्हतेवर ठराविक प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे.
नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला व तेलंगणच्या सीमावर्ती भागात असलेल्या माहूर – किनवट तालुक्यात नेहमीच बोगस बी बियाणे रासायनिक खताची विक्री केली जात असते अशी ओरड होते,त्यातच भर म्हणून मे महिन्याच्या शेवटी रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी विक्रेत्यांनी ग्रामीण भागातून आकर्षक जाहिरातींचा भडीमार शेतकऱ्यांवर सुरू केला आहे. एकदा नामांकीत कंपनीचे विकलेले बियाणे बोगस निघाल्यानंतर वरहात करतात. यामुळे बळीराजा मात्र आर्थिक तोटा सहन करित आपली फसगत झाल्याचे मान्य करुन कपाळावर हात ठेवतो. मोजता येईना ईतक्या बियाणांच्या कंपण्यांनी उत्पन्न वाढीचे आमिष देत तालुक्यात धुडगूस घातला.कापूस, सोयाबीन सह इतर पिकांच्या बियाण्यांची जाहिरात करताना कमी दिवसांत येणारे वाण, अत्यल्प प्रमाणात व कमी दिवसांत येणारे वाण, कमी पावसावर येणारे वाण, भरघोस उत्पादन देणारे वाण, सर्वाधिक बाजारभाव मिळवून देणारे वाण केवळ आमच्याच कंपनीने विकसित केले आहे, असा दावा बियाणे कंपन्या करीत आहेत.
काही बियाण्यांवर विक्रेत्यांना आधी कमिशन व  ठराविक विक्री केल्यास सिंगापूर सारखी परदेश वारी व पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था अशा प्रलोभनामुळे विक्रेते कोणते बियाणे शेतकऱ्याच्या माथी मारतील,याचा नेम नाही. आंध्रप्रदेशातून सीमावर्ती भागातील ग्रामीण बाजारपेठेत बोगस बियाणे विक्रीचे प्रकरण  नवीन नाही? मात्र भोळ्या बळीराजाला पुरेपूर ज्ञान नसल्याने ते पक्की पावती घेत नाहीत, थैली खालच्या बाजूने उघडत नाहीत, अशा चुका अनवधानाने होत असल्याने शेतकऱ्याची फसगत होते,त्या मुळे कायदेशीर तक्रार करण्यास शेतकरी सक्षम नसतो. परिणामी आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याच्य शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येसारखा घातक विचार  येतो.गतवर्षी शेतमालात झालेली उल्लेखनिय घट, पाण्याचे संकट व महागाईने कंबरडे  मोडले असताना लग्न,आजार व इतर  संकटात लागलेला खर्च यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी पुरतेच फसलेले आहेत. आता नवीन पेरणीसाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याने राष्ट्रीयकृत बँकेचे उंबरठे झिजवत असताना अनेकांना खाली हात परत जावे लागत आहे. शेवटी सावकाराच्या दारावर थाप मारल्याशिवाय पर्याय नसल्याने अनेक शेतकरी सौभाग्याचे लेणे असलेले पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विक्रीसाठी सुद्धा नाईलाजाने तयारी करीत आहेत. अशा बिकट परिस्थितीत बोगस बियाणे शेतकऱ्याच्या माथी मारल्या गेले तर वैफल्यग्रस्त अवस्थेतील जगाचा पाशिंदा मृत्युला कवटाळण्यास सारखा आत्मघातकी निर्णय घेत असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
आकर्षक फलकाने सजविलेल्या वाहनातून बियाण्यांची जाहिरात
मुख्य रस्त्यावरचे दिशादर्शक फलक कंपन्याच्या जाहिरातीने बुजून गेले आहेत. शासकीय फलक सुद्धा कंपन्यांना जाहिरातीकरिता कमी गेले आहेत.औषधी बी-बियाणे यांच्या अवाजवी किमती लावून जाहिरात तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची लूट चा कार्यक्रम आखला गेला आहे. आकर्षक तंत्र वापरून तयार केलेले पोस्टर्स गावागावांत लावले जात आहे.शिवाय आकर्षक फलकाने सजविलेल्या वाहनातून बियाण्यांची जाहिरात बियाणे कंपनीकडून केली जात आहे.