परभणी/प्रतिनिधी-राज्य शासन गेल्या दोन वर्षात पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बोलायलाच तयार नसल्याने येत्या 17 मे रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिला.
मराठी पत्रकार परिषद मुंबईच्यावतीने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा गंगाखेड येथ्लृे शुक्रवार, 6 मे रोजी संत जनाबाईंची जन्मभूमी असलेल्या गंगाखेड येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख, स्वागताध्यक्ष गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, प्रमुख वक्ते म्हणून न्यूज एटीएनचे वृत्त निवेदक विलास बडे यांची उपस्थिती होती. मेळाव्यानिमीत्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्याहस्ते विमोचन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करतांना परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी गेल्या दोन वर्षापासून पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री महोदय पत्रकारांना भेटण्यास वेळ देत नाहीत. अशावेळी पत्रकारांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. समाज तसेच प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे मालक देखील पत्रकारांसोबत नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. येणार्या 17 मे रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांना या दिवशी सर्व पत्रकारांनी एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी स्वागताध्यक्षीय भाषणात आ.गुट्टे म्हणाले, की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडझवीस यांच्या कार्यकाळात कै.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीसाठी शासनाने यावर्षी 25 कोटी रुपये दिले आहेत. तसेच छोट्या वृत्तपत्रासाठी जाहिरात दरही वाढविण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या कामगार ते आमदार या राजकीय कारर्कीदाचा प्रवास पत्रकारांसमोर मांडला.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन, गंगाखेड तालुकाध्यक्ष पिराजी कांबळे आदींची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर राजेभाऊ फड, गणेश रोकडे, किसन भोसले, बालासाहेब निरस, ऍड.संतोष मुंडे, विष्णू मुरकूटे, संदीप अळनुरे, तुकाराम मुंडे, विजय जोशी, अनिल महाजन, सुरेश नाईकवाडे, प्रकाश कांबळे, विशाल साळूंके, नंदकुमार महाजन, अनिल वाघमारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब राखे यांनी केले तर आभार गोविंद चोरघडे यांनी मानले.
पत्रकारितेला मोठा इतिहास-विलास बडे या मेळाव्यात मुख्य वक्ते म्हणून बोलतांना आयबीएनचे विलास बडे यांनी पत्रकारीतेला मोठा इतिहास आहे. 26 व्या वर्षी हसतमुखाने देशासाठी फासावर लटकणारा शहीद भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी या महान नेत्यांचा वारसा पत्रकारितेला आहे. हा इतिहास पत्रकार विसरत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. भारत हा खेड्यांचा देश आहे, परंतु माध्यमांमध्ये ग्रामीण भागाचे प्रश्न मांडले जात नाहीत. आता टीआरपीसाठी ग्रामीण वार्तांकनाची सक्ती केल्यामुळे आता सर्वच वृत्तवाहिण्यांवर ग्रामीण भागाचे प्रश्न मांडले जातील. पत्रकारांनी आपसात स्पर्धा जरुर करावी मात्र आपला लढा भांडवली व्यवस्थेशी आहे हे विसरु नये. आपसातील मतभेद विसरुन पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणार्या मराठी पत्रकार परिषदेचे संघटन मजबूत करावे, असे आव्हान केले.