प्रेयसीच्या चार वर्षीय बालकाला दारू पाजून सिगारेटचे चटके देऊन खून करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रोख दंड

नांदेड- आपल्या प्रेयसीच्या चार वर्षीय बालकाला दारू पाजून बेशुद्ध झाल्यावर त्याला सिगरेटचे चटके देऊन त्याचा खून करणाऱ्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी १० वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ८ मार्च २०१७ रोजी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार आली ती तक्रार नंदा दत्ता येसनपुरे रा.सालोड (कृष्णापूर) जिल्हा यवतमाळ या महिलेने दिली होती.तिच्या तक्रारीनुसार तिला दोन मुली आणि एक चार वर्षांचा बालक आदेश उर्फ दिगंबर अशी अपत्ये आहेत.आठ महिन्यांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.त्यानंतर तिचे प्रेम संबंध विकास दिगंबर लांजेवार (२८) रा.सुकळी ता.कारंजा जि.वाशिम याचे सोबत जुळले होते.दिनांक २५ फेब्रुवारी २०१७ रोजी विकास तिला आणि तिच्या मुलाला सोबत घेऊन यवतमाळ येथे जावूत आणि तुझी निराधार संचिका बनवून आणूत असे सांगून दुचाकी गादीवर निघाले.यवतमाळ येथे न जाता माहूरला आले.तेथे हॉटेल रुद्र (लॉज) मध्ये थांबले.त्यांचा मुक्काम २८ फेब्रुवारी पर्यंत तेथेच होता.२८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता चार वर्षांचा बालक आदेश उर्फ दिगंबर रडू लागला.तेव्हा विकासने त्यास दारू पाजली.दारू पिऊन बालक बेशुद्ध झाला.तेव्हा विकासने त्याला शरीरावर अनेक जागी सिगारेटचे चटके दिले.तरीही तो काहीच हालचाल करीत नव्हता.तेव्हा विकासने त्याच्या डोक्यात बुक्यांनी जोरदार प्रहार केले.पुढे त्यास माहूर येथील एका खाजगी रुग्णालयात,सरकारी रुग्णालयात नेले पण त्यांनी आमच्या कडे काही इलाज नाही असे सांगितले.नंतर त्यास १ मार्च २०१७ रोजी मोघे सांगवी जि.वर्धा येथे उपचार करण्यासाठी नेले.तेथे उपचारा दरम्यान बालक आदेश उर्फ दिगंबर (४) याचा मृत्यू झाला.आपल्या बालकाच्या मृत्यूने मानसिक पीडा झालेल्या नंदाने ८ मार्च २०१७ रोजी तक्रार दिली.माहूर येथील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे यांनी याबाबत गुन्हा क्रमांक २८/२०१७ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे दाखल केला.चार वर्षीय बालक आदेश उर्फ दिगंबरचा खून करणारा विकास दिगंबर लांजेवारला अटक केली. तपासातील सर्व त्रुटींचा विचार करून पुराव्यांची साखळी तयार करून काम केले.दरम्यान शिवप्रसाद मूळे काही काळ सुट्टीवर गेले. तेव्हा तपास पोलीस उप अधीक्षक रमाकांत खरात यांनी केला. या प्रकरणाचे दोषारोप पत्र न्यायालयात शिवप्रसाद मूळे यांनीच सादर केले.नांदेड जिल्हा न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक ५४/२०१७ नुसार चालले.

न्यायालयात या खटल्यात सरकार पक्षाने १२ साक्षिदारांच्या जबान्या नोंदवल्या.उपलब्ध पुरावा आधारे न्या.शशिकांत बांगर यांनी विकास दिगंबर लांजेवारला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ भाग दोन प्रमाणे बालक आदेश उर्फ दिगंबरला मारण्यासाठी विकास लांजेवारला दोषी मानले.त्यास १० वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास २ वर्ष सक्तमजुरी प्रस्तावित केली आहे.पकडले तेव्हा पासून विकास लांजेवार तुरुंगातच आहे. या खटल्यात सरकार पक्षांची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आशिष गोदमगावकर यांनी मांडली.माहूर येथील पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार के.एम. मेडपलवार यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली.