माहूर:- माहूर तालुक्यातील सत्तिगुडा गावात १० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत ८ गोठे जळून खाक झाले.विशेष म्हणजे २ गोठ्यात कुटुंब राहत होते. ग्रामस्थांनी धावाधाव करून व माहूर नगर पंचायत आणि किनवट नगर परिषदेची अग्निशमन वाहने वेळेवर पोहचल्याने आग आटोक्यात आली. व हा अग्निपात शांत करता आला.
तालुक्यातील सत्तिगुडा येथे सकाळी ९ च्या सुमारास गोठ्याला आग लागली. आग कशी लागली व कुठे लागली, हे लक्षात येईपर्यंत आगीचा मोठा भडका उडाला,बघता बघता आगीने रूद्र रूप धारण केल्याने लगत ची एका पाठोपाठ एक करत ८ गोठी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.ग्रामस्थांनी धावाधाव करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बोअर व विहिरीचे पाणी टाकून आग विझविण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असताना आगीचे गोळे उडू लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी विशाल जाधव यांनी त्वरित माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना अग्निशमन दल सत्तिगुडा येथे पाठविण्याचे सागितले.तर अन्य एक किनवट चे अग्निशमन दल ही वेळेवर पोहचले त्या मुळे गावकऱ्यांच्या मदतीने आगी वर नियंत्रण मिळविण्यात यश आले.घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,कुंदन राठोड, व अन्य लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. तलाठी राम ठाकरे यांनी पंचनामा केला असून सिंदखेड चे ठाणेदार भालचंद्र तिडके व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही या वेळी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.त्या मुळे कुठलीच जीवित हानी झाली नाही.
