माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह,सिसी रस्ता व पार्किंग ची सोय! जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन ८१ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता!

माहूर:- माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर ) उभारण्यासाठी व सिसी रस्ता आणि पार्किंग करिता जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन ८१.६१ लक्ष रुपयाचा निधी आज दिनांक २६ रोजी मंजूर करण्यात आला आहे.
आदिवासी बहुल दुर्गम भागातील एकमेव शासकीय दवाखाना असलेल्या माहूर ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जादा असल्याने रुग्णावर आणि प्रशासनावर येणारा ताण कमी करण्यासाठी  माहूर चे रुग्णालय अत्याधुनिक आणि सुसज्ज करण्या साठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर ) अद्यावत करण्यासाठी ४७.६७ लक्ष तर सिसी रस्ता आणि पार्किंग ३३.९४ लक्ष रुपयाच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांसाठी ही आरोग्यदायी पर्वणीच आहे. सध्यस्थीतीला नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेड,यवतमाळ,नागपूर अशा शहरी भागातील खाजगी रुग्णालयात जाण्याची नामुष्की येत होती. असे असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या नागरीकांना त्यासाठी लागणारा वेळ, यात होणारा खर्च पेलवणारा नसतो प्रसंगी अनेकांना आपल्या जीवलाही मुकावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, शासन निर्णय अन्वय सुधारीत कार्यप्रणाली द्वारे जिल्हाधिकारी यांना सर्वसाधारण जिल्हा योजनेसंदर्भात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार दिले आहेत. या प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती,यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रस्तावित केलेल्या कामाना मंजुरी दिली आहे.त्यात माहूर ग्रामीण रुग्णालयात आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर ) ला ही मंजुरी मिळाली आहे.
अद्ययावत शस्त्रक्रिया गृहामुळे माहूर ग्रामीण रुग्णालयास महत्व प्राप्त होणार असुन आरोग्य आणि सुरक्षितता,अद्ययावत शस्त्रक्रिया साहित्य,अल्पखर्चिक उपचार  यासारख्या अनेक बाबींनी परिपुर्ण असलेल्या या शस्त्रक्रिया गृहाचे नागरिकांना फायदे होणार आहेत.