सातवा वेतन – गल्लेलठ्ठ पगार आणि अधिकाऱ्यांची लाचखोर प्रवृत्ती….

माहूर:- लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून लाचखोर अधिका-यांना सापळ्यात पकडण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात चांगलेच वाढले आहे. असे असले तरी लाचखोरांची संख्या कमी झालेली नाही. याचाच अर्थ लाचखोरांना कुणाचाच धाक उरलेला नाही. पकडले गेलो तर आपल्यावरचे आरोप न्यायालयात सिद्ध होणार नाहीत, याची या अधिका-यांना खात्री असते. आपल्यावरचे आरोप कसे टिकणार नाहीत, यासाठी आपल्या विरुद्धच्या खटल्यात आरोपपत्रात जाणूनबुजून त्रुटी ठेवण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची लाचखोर अधिका-यांची तयारी असते. यामुळे लाच घेताना पकडले जाऊनही या आरोपाबद्दल शिक्षा झालेल्या अधिका-यांचे प्रमाण खूपच कमी आहे.निसर्गाच्या प्रकोपामुळे संकटात सापडलेल्या शेतक-याकडून तसेच सर्वसामान्यांकडूनही निलाजरेपणाने पैसे उकळण्याचे प्रकार अधिका-यांनी चालवले आहेत.आज च्या प्रकरणात तर संजय एकनाथ घुमटकर वय (40) वर्षे व्यवसाय नोकरी विस्तार अधिकारी (कृषी )पंचायत समिती किनवट अतिरिक्त पदभार माहूर  या
निर्लज्ज अधिकाऱ्याने वृध्द शेतकऱ्या कडून पैसे मागितले होते.गल्लेलठ्ठ पगार आणि नवनवीन वेतन आयोगाचे हार गळ्यात घालून फिरणार्‍या शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांची पैशाची भूक ही जेवणाच्या भूकेपेक्षाही अधिक मोठी आहे,हेच सिंचन विहिरी च्या बिला साठी 60 वर्षीय वृध्द शेतकऱ्या कडून पैसे मागितल्याचा घटने वरून दिसून येते.
एखादा अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यावर त्याच्या बाबतीत चार दिवस कुजबूज होते. नंतर लोक ही घटना विसरून जातात आणि त्या अधिका-याचे आयुष्य निर्धोकपणे पुढे सुरू राहते. सरकारी कार्यालयामध्ये अलीकडच्या काळात प्रामाणिक अधिकारी अत्यंत दुर्मीळ झाले आहेत. एकही सरकारी खाते असे नाही की जेथे एक दमडीही न घेता नागरिकांचे काम नीट केले जाते. शिपायापासून वरिष्ठ अधिका-यांपर्यंत लाच घेणा-यांची एक जबरदस्त साखळी असते. ही साखळी भेदून सामान्य माणसाला आपल्या अडकलेल्या फाईलवर किंवा कागदपत्रांवर संबंधित अधिका-यांचा सही शिक्का मिळवताच येत नाही. सरकारी खात्यांमध्ये सामान्य माणसाला कशा पद्धतीने नाडले जाते, याचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण काही वर्षापूर्वी ‘ऑफिस-ऑफिस’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिकेत करण्यात आले होते. .
शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खिसे गरम केल्याशिवाय कामे मार्गी लागत नाही, हा सर्वसामान्यांचा अनुभव. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांना जरब बसविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या, तरीही लाचखोर आणि लाच देणारे असे दोघेही हुशार झाल्याने होणाऱ्या कारवाईतही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.त्या मुळे लाचखोर अधिकारी कर्मचारी यांची संख्या व झालेली कार्यवाही या दोन्ही आकड्यात जमीन आसमान तफावत आहे.कारण सापळ्यांमध्ये सापडू नये यासाठी लाचखोरांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.लाच घेतल्यानंतर शिक्षा होते,अशी जरब निर्माण केल्यामुळे लाचखोर थेट पैसे मागण्याचे टाळतात. मध्यस्थांमार्फत लाच घेण्याच्या प्रकरणांमध्येही तक्रारदार पुढे आल्यानंतर त्यांच्या तक्रारीनुसार संबंधितांवर कारवाई केली जाते.कार्यवाही तून होळी ची बोंब चार दिवस असते,त्या नंतर त्या खटल्यात अधिकांश लाचखोर अलगद बाहेर पडत असल्याने  सरकारने भ्रष्टाचारासंबंधीची खटले फास्ट चालवायला हवीत. तरच भ्रष्टाचाराचा रोग आवरला जाईल.