माहूर वळण रस्ता बनला मृत्यूचा सापळा; दुचाकी चालकांची तारेवरची कसरत!

माहूर:- धानोडा – माहूर हा 5 कि.मी.चा वळण रस्ता अतिशय खराब झाला असून अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकास फार मोठी कसरत करावी लागते. सदर चा रस्ता चाळणी झाल्याने दुचाकी धारक यांचे अपघात नित्याचेच झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
शेकापुर फाटा ते माहूर या घाटातील रस्त्याचे काम महामार्ग विभागाने हाती घेतले आहे.त्यामुळे गुत्तेदाराणे माहूर शहरात येणारा रस्ता तात्पुरता बंद केला आहे.परिणामी वाहनधारकांना लांजी या एकमेव वळण रस्त्याचा उपयोग करावा लागत आहे.मात्र हा वळण रस्ता बद से बद्दतर झाला असून या रस्त्यावरून दुचाकी चालविणे म्हणजे मृत्युला व अपंगत्वाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विदर्भ – मराठवाडा – तेलंगणा या त्रिवेणी संगमाला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर कायम वर्दळ असते. परंतु सध्या या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहेत. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून नादुरुस्त हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडला आहे.रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.  या रस्त्याच्या अवस्थेबाबत वसंत झरिकर सहा.अभियंता श्रेणी 1 सार्वजनिक बांधकाम विभाग माहूर यांना विचारणा केली असता त्यांनी या वळण रस्त्याच्या कामाला लवकरच मंजुरी मिळणार असून पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.