माहूर:- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहीम रविवार, ता. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहीम दरवर्षी राविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दीष्टे निश्चित करण्यात येते.या अंतर्गत तालुक्यातील ८ हजार बालकांना या लसीकरण मोहिमेचा लाभ होणार आहे अशी माहिती गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दिली आहे.

माहूर तालुक्यातील ग्रामिण भागात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असून यात आष्टा, वाई(बा) सिदखेड, वानोळा, इवळेश्वर प्राथमिक केंद्राचा समावेश असून एकूण २७ आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत.पोलिओ लसीकारणासाठी प्रत्येक गावात बूथ नियोजन करण्यात आले आहे, तालुक्यात एकूण ११२ बूथ तयार करून अंगणवाडी,जिल्हा परिषद शाळेत दिनांक २७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रत्येक बूथ वर शून्य ते ५ वर्षे वय गटातील बालकाना पोलिओ लसीचे दोन थेंब मात्रा प्रशिक्षित आयोग्य कर्मचाऱ्यांकडून पाजवले जाणार आहेत.११२ बूथ साठी २६९ कर्मचारी ज्यात आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर,अंगवाडी वर्कर व आशा गटपरवर्तक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.ग्रामिण भागातील गीट्टी खदान विटभट्टया व उस तोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईल टिमची नियोजन करण्यात आल्याचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी सांगितले.
