‘वसुली’साठी अपहरण करुन डांबून ठेवले; माहूर पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या!

माहूर:- हात उसने म्हणून घेतलेले ५ लक्ष ४० हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरुन ऊसतोड मजुरांचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले होते,माहूर पोलिसांनी मोबाईल लोकेशन ने गुन्हेगाराचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील फिर्यादी रमेश कनिराम आडे यांनी माहूर पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांचा भाऊ मोहन कनीराम आडे हा बाजार करून येतो असे म्हणून दिनांक ०२ जानेवारी रोजी घरून निघाला होता. तो संध्याकाळी सात पर्यंत घरी आला नसल्याने त्याच्या पत्नीने सांगितल्या वरून गावातील सरपंच रामेश्वर किसन जाधव व उपसरपंच राहुल सतपाल कांबळे यांच्या सह परिवारातील सदस्य शोध घेण्यकामी माहूर शहरात आलो असता किसन चंदु राठोड हा भेटला व म्हणाला की तुम्ही तुमच्या भावास शोधू नका तो माझ्या साडभाऊ गोविंद देवला राठोड रा.घानमुख ता. महागाव याचे ताब्यात असून तुमच्या भावाने माझ्या साडुकडुन ५ लाख ४०,हजार रूपये घेतल्याने त्याने त्यास नेले आहे, तुम्ही त्याचे पैसे परत करा तुमचा भाऊ तुम्हाला परत मिळेल असे म्हणाल्याने परिवारातील सदस्यांनी किसन कडून गोविंद राठोड चा मोबाईल नंबर घेत संपर्क केला असता गोविंद राठोड याने मोहण कनिराम आडे हा माझे ताब्यात असल्याचे सांगत त्याचे पैसे परत दिले तर मोहण ला तुमच्या ताब्यात देतो असे सांगितले. परिवारातील सदस्यांनी पैसे परत देण्याची हमी देत मोहन ला आणून द्या अशी विनंती केली असता त्याने उद्या मोहन ला घेऊन येतो असे सांगितले मात्र मोहन परत न आल्याने रमेश कनिराम आडे यांनी माहूर पोलिसात रीतसर फिर्याद दिल्याने पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप,जमादार विलास आडे,छगन जाधव,सुशील आडे यांनी तपासाची चक्रे फिरवून मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपी गोविंद देवला राठोड व त्यास अपहरणास मदत करणारे किसन चंदु राठोड या दोघांचा शोध लावून त्यांना आज दिनांक १८ रोजी बेड्या ठोकल्या आहे.