गोंडवडसा आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर दीड वर्षापासून गैरहजर!

माहूर:- माहूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या गोंडवडसा आरोग्य उपकेंद्राला मागील दीड वर्षापासून समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हर्षदा निरंजन केशवे ह्या गैरहजर असल्याने त्यांची सेवा समाप्त करून प्रयायी व्यवस्था करा अशी मागणी गोंडवडसा ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य व नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोंडवडसा आरोग्य उपकेंद्रात डॉ.हर्षदा निरजन केशवे यांची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक आहे.मागील दीड वर्षापासून त्या अनधिकृत गैर हजर असून प्रस्तुती रजेवर गेल्या पासून आज पर्यंत कधीच त्यांनी गोंडवडसा उपकेंद्रात पाय ठेवलेले नाही.सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णसंख्येत चांगलीच वाढ होत आहे.स्थानिक नागरिकांना उपकेंद्रात उपचार मिळणे क्रमप्राप्त असताना डॉ. हर्षदा निरजन केशवे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र गोंडवडसा हे गैरहजर असल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागत आहे.त्या मुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड तर होत आहे.शिवाय ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याच्या शासनाच्या उद्देशाला ही हरताळ फासले जात आहे.त्या मुळे गोंडवडसा व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता डॉ. हर्षदा निरजन केशवे यांची सेवा समाप्त करून प्रयायी व्यवस्था करण्यात यावी व माहे मे २०२१ पासून अनधिकृत गैर हजर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड येथील वैधकिय अधीक्षक यांनी त्याच्या उपस्थिती संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात केलेला पत्र व्यवहार आणि गैरहजर असल्या बाबत च्या नोंदी तपासून योग्य कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर सरपंच भास्कर पूरके,उपसरपंच शौकत अली, ग्राम पंचायत सदस्य चांदाबाई रामेलवार, काजल कातले,विमल पूरके,हिना कौसर खान, तस्निम शेख,माधव तोडसाम,दौलत मेश्राम,या सात ग्राम पंचायत सदस्या सह ४६ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  गोर गरीब जनतेचे हाल …..
उपकेंद्रात डॉक्टरच नसल्याने, गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल सुरु आहेत.विशेष बाब म्हणजे, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर कुणाचाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती वर प्रशासक असल्याने सर्वत्र अधिकारी प्रशासक असल्याने आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना चांगलेच फावले आहे.