सहा टेबल – चौदा फेऱ्यात होणार मतमोजणी; एका फेरीत दोन ग्रामपंचायतीचे लागणार निकाल!

माहूर:- माहूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल उद्या मंगळवार रोजी जाहीर होणार आहे.त्या साठी सकाळी १० वाजता मत मोजनीला सुरुवात होणार असून सहा टेबल – चौदा फेऱ्यात मतमोजणी होणार असून एका फेरीत दोन ग्रामपंचायतीचे  निकाल लागणार आहे.
मिनी मंत्रालयाची पायाभरणी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. येथील सत्ता आणि परिवर्तनाचा थेट परिणाम भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दिसणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावांत संघर्ष आणि कमालीची ईर्ष्या पाहायला मिळाली. मात्र, मतदानाच्या दिवशी काल रविवारी तालुक्यातील बहुतांशी गावांत सरपंचपदासाठी ‘सिंगल व्होटिंग’ झाल्याच्या चर्चेने सदस्यपदाच्या उमेदवारांची धास्ती वाढवली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करत असलेल्या इच्छुकांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गेल्या आठ दहा दिवसांपासून ‘घर टू घर’ प्रचार यंत्रणा राबवत मतदारांशी संपर्क ठेवला. मात्र, जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी बहुतांश गावांत ‘सिंगल व्होटिंग’वर भर दिल्याची चर्चा होती.विशेष म्हणजे सरपंच पदासाठी एक आणि एका प्रभागात सदस्य पदासाठी ३ असे एकूण ४ मतदान मतदाराला करायचे असल्याने त्यात अनेक मतदार गोंधळून गेले.त्या मुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याची चर्चा आहे.