महापुरुषांचा अपमान कदापि सहन केले जाणार नाही:- नाना पटोले

माहूर-  काँगेस पक्ष हा शिव विचारा वर चालणारा, शिवप्रेमी व शिवशाही ला मानणारा आहे.जो कोणी महाराष्ट्र नाही तर देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्रातील बहुजन विचार मानणाऱ्या नेत्यांचा अपमान करेल हे काँग्रेस सहन करणार नाही.या पूर्वी ही राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान केला आहे.आता भाजपची पिल्लावडे वादग्रस्त विधान करत सुटले आहे. भाजपचा हा खरा चेहरा जनते समोर आल्याची टीका काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज माहूर दोऱ्यावर होते,त्यांनी स्थानिक विश्राम गृहावर पत्रकारांशी बातचीत केली या वेळी ते म्हणाले, केंद्रीय मंत्री दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला.या पूर्वी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी,भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानातून भाजपची मानसिकता दिसून येते,काँग्रेस चा या व्यवस्थेला विरोध असल्याचे सांगत ज्यांना पेशवाही मान्य असेल त्यांनी पेशवाही सोबत जावे,काँग्रेस पक्ष शिव विचारा वर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी तील घटक पक्ष असलेल्या शिवसेने कडून शिवशक्ती – भीमशक्ती च्या हालचाली विषयी त्यांनी प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोणा सोबत जावे हा ही त्यांचा अधिकार आहे.एका विपरीत परिस्थिती मध्ये पहाटे चे सरकार झाल्या नंतर ते सरकार ७४ तासात कोसळले.त्या वेळी राज्याच्या जनतेवर निवडणुका थोपल्या जाऊ नये म्हणून सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतल्या नंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम आखून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले.याच सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज माफी सारखे मोठे निर्णय घेतले. महाविकास आघाडी टिकवायची की नाही हा त्यांचा भाग आहे.काँग्रेस पक्षाची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची असून छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या विचाराशी जे सहमत असतील ते आमच्या सोबत राहू शकतील असे ही शेवटी नाना पटोले यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देवानंद पवार यांची उपस्थिती होती.तत्पूर्वी स्थानिक विश्राम गृहावर नगराध्यक्ष फिरोज दोसानी,युवक राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मारोती रेकुलवार,सभापती अशोक खडसे,रणधीर पाटील,इरफान सय्यद,अमित येवतिकर यांनी पटोले यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.