ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा, निवडणूक आयोगाची माहिती!

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.  ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यात अडचण येत असल्याने ही मुभा देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज सादर करताना अडचण येत होती.विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.  

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

असा आहे निवडणूक कार्यक्रम –

अर्ज दाखल करण्याची मुदत – 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर

अर्ज छाननी – 05 डिसेंबर

अर्ज मागं घेण्याची तारीख – 7 डिसेंबर

मतदान – 18 डिसेंबर

मतमोजणी आणि निकाल – 20 डिसेंबर