माहूर ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण आरोग्य सेवेची ऐशी-तैशी;डॉक्टर शोधून सापडेना;गंभीर रुग्णाला करावी लागते डॉक्टरांची प्रतीक्षा!

माहूर(सरफराज दोसानी) माहूर ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांच्या अनुपस्थिती मुळे वादात सापडले आहे.नवरात्र काळात २४/७ आरोग्य सेवा देण्याची शाश्वती देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकांसह एक ही डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्याने गंभीर रुग्णाला देखील उपचारासाठी डॉक्टरांची वाट पाहत थांबावे लागले.आरोग्य विभागाचे लक्तरे वेशीवर घालणारी ही घटना आज दिनांक ०१ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

तीर्थक्षेत्र माहूर गडावर नवरात्र महोत्सव सुरू असून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. दिवसभर दर्शनासाठी मंदिरात रांगाच रांगा असल्याने व मंदिर रात्री १० वाजे पर्यंत दर्शनासाठी उघडे आल्याने सायंकाळी व रात्री भाविक गडावर माता रेणुकेच्या दर्शनासाठी जात आहे.अशाच एक महिला भाविक खुशबू व्यंकटेश सेल्लावार (३३) ह्या माहूर गडावर दर्शनासाठी गेल्या असता त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली व त्या खाली कोसळल्या.त्यांना तुरंत श्री रेणुका देवी मंदिर प्रशासनाच्या रुग्ण वाहिकेतून माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या ठिकाणी एक ही डॉक्टर नव्हते.केवळ एक महिला व एक पुरुष तृतीय,चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते.त्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा साठी नेमलेल्या डॉ.वाशिम यांना बोलावून घेतले.या सगळ्या घडामोडीत १५/ २० मिनिट सदर चा रुग्ण हा डॉक्टरांच्या प्रतीक्षेत होता.दरम्यान दुसरा एक अन्य रुग्ण बबलू बेग मिर्जा बेग शुगर कमी झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात आला.मात्र त्याला बघण्यासाठी डॉक्टर नव्हते.त्या नंतर डॉ.कान्नव यांना बोलवण्यात आले.रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष बघून माध्यमांच्या प्रतिनिधींनी यात्रा व्यवस्थापनातील जबाबदार अधिकारी यांना फोन लावला मात्र त्यांनी तो उचलला नाही.तर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.झिने यांच्या कानावर सदर चे प्रकरण घातले असता त्यांनी मी बघते असे सांगून वेळ मारून नेली.विशेष म्हणजे रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टराची गैर हजेरी या ठिकाणी उल्लेखनीय आहे. माहूर ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा बद से बत्तर झाली असून कर्तव्यकसूर डॉक्टरांना नवरात्र उत्सवाचे ही गांभीर्य नसून कोणाचे ही या रुग्णालयावर नियंत्रण नसल्याने रुग्ण सेवा पार कोलमडली आहे.

## भोसीकर साहेब जरा इकडे लक्ष द्या हो.…##

ग्रामीण भागात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नाही. वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही,अशी ओरड नित्याने होत आहे.त्यामुळे यातील वास्तविकता जाणून घेण्यासाठी किमान महिन्यात एखाद्या वेळी आकस्मित भेट देऊन माहूर ग्रामीण रुग्णालय चे कारभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोसीकर यांनी तपासावे अशी नागरिकांची मागणी आहे.त्यात जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांनी मागील ६ महिन्याचे ओपीडी चे पेपर,नवरात्र काळातील उपस्थित डॉक्टरांची सेवा तपासण्यासाठी सिसीटीव्ही फुटेज,आणि आपले कृष्ण कृत्य लपविण्यासाठी अधिकाराचे दुरुपयोग करून अनधिकृत लावण्यात आलेली डॉक्टरांची नाईट ड्युटी ची माहिती घेतल्यास धक्का दायक वास्तव समोर येईल मात्र इतका वेळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोसीकर यांना मिळेल का….? हा संशोधनाचा विषय आहे.