निवडणूक निकालाविषयी उमेदवारांसह मतदारांत उत्सुकता; २२ ग्रामपंचायती साठी ८१.२० टक्के मतदान!

माहूर:- तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज रविवारी मतदान पार पडल्यानंतर सर्वांना मतमोजणीची उत्सुकता लागून राहिली असून, उद्या सोमवार रोजी तहसील कार्यालयात मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. ग्रामीण भागातील मतदार गावाच्या कारभाराची सूत्रे कोणाकडे सोपवतात, हे उद्या सोमवारी स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांमध्ये देखील निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.सरकारी यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे.

आज माहूर तालुक्यातील २२ ग्राम पंचायतीसाठी एकूण ८१.२० टक्के मतदान झाले.२७ हजार ०४४ मतदारा पैकी २१ हजार ९५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यात ११ हजार ६३६ पुरुष मतदार तर १० हजार ३१८ महिला मतदारांचा समावेश आहे.मतदान ला सुरुवात झाल्यानंतर संत गतीने मतदारांची गर्दी दिसून आली.नंतर दुपारच्या सत्रात मतदार मतदानासाठी बाहेर आले.सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदारांनी चांगली हजेरी लावली.मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची उमेदवार शेवटच्या क्षणी समजून काढण्याचा प्रयत्न करत होते. एकूण मतदान शांतताप्रिय वातावरणात संपन्न झाले. कोणतेही अघटीत घटना घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तथापि काही उमेदवारांनी मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप प्रत्यारोप झाला.हा अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. तालुक्यातील मतदान झालेल्या सर्वच ग्राम पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांबरोबर नवोदित उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले होते, गाव पातळीवर ग्राम पंचायत निवडणूक निकालाबाबत जोरदार चर्चा सुरू असून, कोण निवडून येणार, याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहे.