माहूर तालुक्यातील हडसनी येथे अनोखा ट्रॅक्टर पोळा!

माहूर(सरफराज दोसानी):- शुक्रवारी सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा होत असताना माहूर तालुक्यातील हडसणी येथे ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. बैलजोडीप्रमाणेच आज अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे करतात. ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत पोळा हा सण मोठ्या थाटात साजरा करतो.त्याचप्रमाणे ट्रॅक्टर मालकाने देखील अनोखी शक्कल लढवीत हा ट्रॅक्टर पोळा भरविला होता.
माहूर तालुक्यातील हडसनी येथे अनोखा ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्यात आला होता. या अनोख्या पोळ्यात ३१ हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते.गावातील शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरला स्वच्छ धुवून त्याला सजवत गावातील मंदिरा पर्यंत मिरवणूक काढत आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोळा सणाचा उत्सव साजरा केला.भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पूर्वी देशात बैलांच्या माध्यमातून शेतीची काम शेतकरी करीत असे, त्यामुळे देशात बैलांच्या प्रती कृतघ्नता म्हणून एक दिवस बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र आजच्या यांत्रिकी युगात बैलांच्या माध्यमातून शेती करताना वेळ खर्च होत असल्याने सध्या परिस्थितीला अनेक शेतकरी यांत्रिकी युगाचा आधार घेता. कमी वेळेत कमी खर्चात शेतीची काम होत आहे. असे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ती साधन उपलब्ध नसली तरी तो पारंपरिक पद्धतीने का होईना बैलांच्या माध्यमातून शेतीची काम करीत असतो. ज्या शेतकाऱ्यांकडे बैल जोडी नाही अशा शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टरची मिरवणूक काढत पोळा साजरा केला.ट्रक्टर संघटना अध्यक्ष विनोद भावराव जाधव आयोजन समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले होते. आजचा आधुनिक व स्पर्धेच्या युगात शेतीची बहुतांश कामे शेतकरी ट्रॅक्टरद्वारेच करतात. त्यामुळे बैलांच्या पोळ्याप्रमाणेच ट्रॅक्टरचा पोळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.