सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे मराठीत स्वतंत्रपणे तत्वज्ञानाचे निरूपण करणारे आद्य तत्वज्ञ होते. प. पू. प. म.न्यायंबास बाबा शास्त्री

 माहूर :- महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्धी महोत्सव दि.२९ ऑगस्ट रोजी  श्री देवदेवेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी धर्मसभेच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून विराजमान झालेल्या प.पू. प. म. न्यायंबास बाबा शास्त्री (मकरधोकडा) यांनी आपल्या रसाळवाणीतून केलेल्या  प्रवचनातून महाराष्ट्राच्या साहित्यिक,सांस्कृतिक,धार्मिक व राजकीय इतिहासात सत्य, अहिंसा, समता,शांती,भूतदया,जातीभेदातीत स्पृश्यास्पृश्यता निर्मूलनाचे कार्य जर सर्वप्रथम कोणी केले असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीच केले आहे.
आद्य समाजसुधारक व मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान देणारे ते थोर जिवोद्धारक ईश्वर अवतार होते.मराठीत स्वतंत्रपणे तत्वज्ञानाचे निरूपण करणारे आद्य तत्वज्ञ होते. लिळा चरित्र हा त्यांच्या लीळांचा संग्रह असलेला व पंडित माहीमभट्टानी संकलित केलेला मराठीचा आद्य ग्रंथ होय.स्वामींच्या तपस्विनी महदंबा यांनी रचलेले महदंबेचे धवळे हे पहिले काव्य होय.स्वामींनी जे परावर ज्ञान अनेक भक्तांना दिले, त्या ज्ञान मार्गाचे आदीकारण श्री दत्तात्रेय प्रभू होत. श्री दत्तात्रेय प्रभू पासून श्री चक्रपाणी महाराजांनी येथेच परावर ज्ञानशक्ती  स्वीकार केली.त्यांचेपासून श्री गोविंदप्रभू व श्री गोविंद प्रभू पासून सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण करून ते दिव्य ज्ञान दिले. तेंव्हापासूनच महाराष्ट्राच्या इतिहासात समाज सुधारणेचा प्रारंभ झाल्याचे न्यायंबास बाबा म्हणाले.
धर्मसभेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. देवदेवेश्वर संस्थानचे पिठाधिष प.पू. प. म.मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी विद्वान संत-महंतांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.धर्मसभेच्या व्यासपीठावरून महंत मुधोळव्यास बाबा, एकोंव्यांस बाबा,योगीराज बापू,विनोद शास्त्री दर्यापूरकर व सतीशदादा अमृते या सर्व वक्त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अवतार कार्य, स्त्री पुरुष  समानतेचे कार्य,अहिंसा, सत्य, शांती अश्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचार आचार प्रणालीचे वर्णन केले.आयोजक माहुर पिठाधिष प. पू. प. म.मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी शुभेच्छापर भाषण केले.सूत्रसंचलन पंडितराज अमृते यांनी केले तर प्रदीपदादा यांनी आभार मानले.