यवतमाळ (हरीश कामारकर ) राज्यात बंडखोरी करीत एकनाथ शिंदेंनी भाजप ला सोबत घेवुन राज्यात सत्ता स्थापन केली परंतु मंत्रिमंडळ विस्तार होण्यापुर्वीच पुराने राज्यात थैमान घालुन हाहाकार माजविला असतांना पुराने सर्वस्व हिरावलेल्या नागरिकांना मदतीची गरज असतांना मात्र त्यांच्या हक्काचे असलेले आमदार मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल या आशेने मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याच अपेक्षा घेवुन वावरत असुन त्यांनी मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडले असतांना या पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीला राज ठाकरे यांच्या मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धावुन गेले असुन या पुरपीडीत नागरिकांच्या अन्न ,वस्त्र व निवाऱ्याच्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तर अतिवृष्टीमुळे उभे पिक वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांना बी बियाण्यांची मदत सुद्धा करीत आहेत.
महिना भरापासुन विदर्भात सुर्य दर्शन घडलेच नसुन नेहमीच काळेकुट्ट ढग दाटुन पावसाची संततधार चालुच असुन पुराने सर्वत्र थैमान घातले. अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले. आभाळच फाटल्यावर ठिगळ कुठे लावणार, असा प्रश्न विचारत शेतकरी रोज रडतोय. पण त्याचे अश्रू पुसायला कुणी नाही. आत्तापर्यंत तर मुख्यमंत्री आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पाहिजे होते. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत. तर आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार होवुन मंत्रिमंडळात आपल्या नक्कीच स्थान मिळेल या आशेवर जगत असुन जगाचा पोशिंदा डोळ्यादेखत पुराने सर्वस्व हिरावुन नेल्याने हतबल झाला.पुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले. पण त्याचा अहवाल तयार होईल, मग तो पुढे जाईल, तोपर्यंत जगायचं कस या विवंचनेत शेतकरी सापडला असुन त्याला कोणीही वाली उरला नसल्याचे चित्र दिसत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना’ त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात सुरू केली आहे. वणी, मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाणी न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. तर आता झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे.
या योजनेमध्ये पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना रब्बी हंगामात उभारी मिळावी, म्हणून राजु उंबरकर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वणी उपविभागातील जवळपास ६०० ते ७०० शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे, खते कीटकनाशके, यांसह इतर शेतीसाहित्य शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच नेऊन दिले जाणार आहे. याशिवाय दोन टप्प्यांत पाच, पाच हजार, असे एकूण १० हजार रुपये या योजनेत सामावून घेतलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. जेणेकरून अशा परिस्थितीत तो शेतकरी कमीत कमी उभा झाला पाहिजे आणि त्याचे मनोबल वाढले पाहिजे. जगाचा पोशिंदा संकटात असताना मदत तर दूरच पण प्रशासन त्याच्यापर्यंत पोहोचलेले देखील नाही. शेतकरी भयभीत झाला आहे. त्यामुळे त्याला उभारी देण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे, असे राजू उंबरकर यांनी ‘नवाकाळ’शी बोलताना सांगितले.मनसेने ७ शेतकरी दत्तक घेतलेलेच असुन त्यांना बी बियाणे, खते पोहोचविलेले आहेत. ही योजना यवतमाळ जिल्ह्यात पहिला टप्पा वणी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात राबविण्यात येत असल्याचेही उंबरकर म्हणाले. आतापर्यंत प्रशासनच काय कोणताही लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत अद्याप पोहचला नाही. पण मनसेने जी मदत केली त्या मदतीमुळे आम्ही थोडेफार का होईना, परिस्थितीतून सावरण्याचे बळ मिळाल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत . सरकारनेही अशी एखादी योजना पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांधुन जोर धरत आहेत.मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी जिल्ह्यात सुरू झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवुन पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू केले होते. पुरात अडकलेल्यांना शिजवलेले सकस व चांगले अन्न, धान्याची ,कपड्यांची गरज भागवली जात आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी पण पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले होते. तेव्हा शुद्भ पाणी कॅनमधून गरजवंतांपर्यंत पोहोचवले .शेतकऱ्यांनावर अगोदरच शासन व्यवस्था, सावकार,बोगस बियाणे विकुन कृषि केंद्र चालकांकडुन होणारी फसवणुक अशा सुलतानी संकटाचा मारा चालुच असतांना त्यात भरीस भर अस्मानी संकटाचे डोंगर कोसळले असल्याने शेतकरी पुरता खचला असतांना त्यांना मदतीची गरज असल्याचे जाणुन “सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्प भुधारक शेतकरी दत्तक योजना “ सुरू करण्यात आल्याची माहिती मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी दिली.