महसूल सहायकास 5 हजाराची लाच घेतांना अटक

नांदेड:- तहसिल कार्यालयातील महसूल सहायक संदीपकुमार लक्ष्मणराव नांदेडकर वय वर्षे 42 याला 5 हजाराची लाच स्विकारतांना आज अटक करण्यात आली. 73 वय वर्षे असलेल्या पुरुषाने दिलेल्या तक्रारीवरून लाचलूचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक राहूल पखाले, पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी कार्यवाही करून लाचेची 5 हजार रक्कम हस्तगत केली.

सोमवार 25 जुलै रोजी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार प्राप्त झाली होती. विभागाने तात्काळ दुसऱ्या दिवशी याची पडताळणी केली. दिनांक 26 जुलै रोजी सापळा रचून आरोपी लोकसेवकास अटक केली. लोकसेवकाने तक्रारदार यांच्या विरुद्ध सीआरपीसी कलम 111 प्रमाणे निघालेल्या नोटीसमध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व नोटीस निकाली काढण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून ही रक्कम स्वत: स्विकारली आहे. लोकसेवकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली. या कार्यवाहीमध्ये पोलीस हवलदार हनुमंत बोरकर, पोलीस नाईक गणेश तालकोकुलवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव, पोना सोनटक्के यांनी सहाय्य केले.

लाचचेची मागणी कोणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधा
– पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्रकुमार शिंदे

नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना नेमून दिलेली कर्तव्य प्रामाणिकपणे बजावली पाहिजेत. कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यक्तीरिक्त अन्य लाचेची मागणी जर कोणी करत असेल तर याची त्वरीत माहिती आम्हाला कळवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्रकुमार शिंदे यांनी केली आहे. संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
 
डॉ. राजकुमार शिंदे
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड
संपर्क क्रमांक 9623999944.
 
राजेंद्र पाटील
पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड
संपर्क क्रमांक 7350197197.
 
टोल फ्री क्रमांक 1064
कार्यालयीन दूरध्वनी 02462-253512.