दूषित पाण्यामुळे 60 नागरिकांना गॅस्ट्रोसदृश आजार! सिरंजनी, साकुर गावाचा विद्युत पुरवठा मागील दहा दिवसापासून खंडित!

माहूर:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वानोळा अंतर्गत येणाऱ्या सिरंजनी, साकुर गावाचा विद्युत पुरवठा मागील दहा दिवसापासून खंडित असल्यामुळे गावातील सार्वजनिक नळयोजना बंद झाली आहे.परिणामी गावातील नागरिकांनी गावा शेजारील शेतातील विहिरीतून पिण्यासाठी पाणी  वापरले सदरील विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे गावातील 55 ते 60 नागरिकाना ताप, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्यांसह गॅस्ट्रोसदृश आजाराने ग्रासले आहे.दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडून आला अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार यांनी दिली.
काल सोमवार दिनांक 11 रोजी सिरंजनी, साकुर गावातील नागरिकांना उलटी व मळमळ आदी स्वरूपाचे लक्षणे दिसून आले.तालुका आरोग्य अधिकारी यांना प्राथमिक माहिती कळताच तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र वानोळा येथील वैद्यकीय पथक त्यांनी गावात पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी आत्राम,डॉ. पंकज नरवाडे आणि इतर कर्मचारी गावत दाखल झाले. त्यांनी रात्री 8 वाजता गावात घरोघरी सर्वेक्षण करून रुग्णांना वर औषधोपचार केला.आज मंगळवार 12 रोजी माहूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार यांनी सदर गावाला प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थित वैद्यकीय पथक यांना योग्य त्या सूचना करून आवश्यक असलेला परिपूर्ण औषधसाठा उपलब्ध करून दिला.रुग्णांना औषधोपचार करून सतर्क राहण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते कॉ.शंकर सिदाम, माहूर पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. गावंडे, माहूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कार्यक्रम सहाय्यक ईश्वर राठोड, डेटा एन्ट्री ऑपरेटर मनोज राठोड उपस्थित होते.सदर आरोग्य पथक हे जिल्हा परिषद शाळा शिरंजनी साकुर येथे ठेवण्याच्या सूचना माहूर पंचायत समिती गटविकास अधिकारी सुरेशजी कांबळे यांनी दिल्या. जिल्हा परिषद शाळेतील आरोग्य पथकात 17 रुग्णांना सलाईन इंजेक्शन व 44 रुग्णांना औषधोपचार करण्यात आला. उपकेंद्राच्या आरोग्य सेविका एस.आर.जाधव,आरोग्य कर्मचारी किरण कांबळे तसेच बाळू टोपलवार या कर्मचाऱ्यांचे पथक रुग्णावर लक्ष देऊन आहेत.